निकालाने जुन्या राजकीय आडाख्यांना धक्का!

Published in Loksattaदेश-विदेश – Loksatta
1 year ago   by लोकसत्ता टीम

पंतप्रधानांचे प्रतिपादन; वाराणसी दौऱ्यात मतदारांचे आभार

भाजप हा हिंदी भाषिक पट्टय़ापुरता हा समज पसरवण्यात आला. मात्र लोकसभा निवडणूक निकालाने ही सारी भाकिते, समज खोटा ठरला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.

निवडणूक निकालानंतर वाराणसी या त्यांच्या मतदारसंघाला पंतप्रधानांनी भेट दिली. काशी विश्वनाथ मंदिरात पंतप्रधानांनी पूजा केली. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आसाममध्ये भाजप सरकार आहे. लडाखमध्ये आम्ही यश मिळवले, प्रत्येक विभागात भाजपची टक्केवारी वाढली आहे. तरीही राजकीय पंडितांना आकलन होत नाही असा टोला पंतप्रधानांनी लगावला. आपल्याविषयी जे गैरसमज पसरवतात त्यांना कठोर परिश्रमाने व पारदर्शिकतेने पराभूत करता येऊ शकते असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. सरकार व पक्ष संघटनेत समन्वय गरजेचा आहे. सरकार धोरण तयार करते तर संघटना रणनीती आखते. याच्या समन्वयातून देशाला फायदा होता.  भाजपला राजकीय अस्पृश्यतेचा सामना करावा लागला होता. केरळ, पश्चिम बंगाल किंवा काश्मीरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. मात्र माध्यमांनी त्याची फारशी दखल घेतली नाही अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली. काही लोक सोयीचा विचार करतात असा टोला त्यांनी लगावला. मतपेढीच्या राजकारणाने लोकशाहीचे नुकसान झाले आहे. मात्र आमचे धोरण सर्वाचा विकास हे आहे. मतपेढीच्या राजकारणाचे ओझे आमच्यावर नाही असे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशच्या जनतेने देशाला लोकशाही बळकटीकरणाचा मार्ग दाखविल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. विरोधी निवडणूक लढविलेल्यांचे त्यांनी आभार मानले. लोकशाहीत विरोधकांचे महत्त्व असल्याचे स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांना श्रेय

पक्ष कार्यकर्तेच भव्यदिव्य असे घडवितात. विजयाचे श्रेय  कार्यकर्त्यांचे आहे. त्यांनीच सरकारच्या धोरणांबाबत जनमानसात जागृती केली. देशवासीयांसाठी मी पंतप्रधान असलो तरी वाराणसीवासियांसाठी  खासदार आहे, सेवक आहे असे  स्पष्ट केले.

निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वाराणसी या त्यांच्या मतदारसंघाला भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

First Published on May 28, 2019 1:46 am

Web Title:

all the speculations the assumption that the lok sabha elections have exposed


Other Items